रावळपिंडी- या महिन्याच्या सुरुवातीला ज्या तीन गुन्हेगारांनी माझ्यावर हल्ला केला, ते पुन्हा प्राणघातक हल्ला करू शकतात, असा दावा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे.
रावळपिंडी येथे त्यांचा पक्ष तेहरीफ-ए-इन्साफच्या रॅलीला संबोधित करताना इम्रान खान म्हणाले की, मी त्या हल्ल्यात मृत्यूला अगदी जवळून पाहिले आहे. माझ्या डोक्यावरून गोळ्या जात होत्या. दोन हल्लेखोरांपैकी एकाने माझ्यावर आणि इतर पीटीआय नेत्यांवर गोळीबार केला. दुसर्या हल्लेखोराने कंटेनरवर गोळीबार केला, तर तिसरा व्यक्ती मारेकर्याला शांत करण्यासाठी तिथे होता. इम्रान यांनी दावा केला की, तिसर्या शूटरने रॅलीमध्ये एका व्यक्तीला ठार केले, त्यानंतर तो संभाव्य मारेकर्याला मारण्याचा प्रयत्न करत होता. आता ते तीन हल्लेखोर पुन्हा माझ्यावर प्राणघातक हल्ला करण्याच्या तयारीत आहेत, असा दावाही खान यांनी यावेळी केला. दरम्यान, 3 नोव्हेंबरला वजिराबाद येथे एका निषेध मोर्चादरम्यान इम्रान खान यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. इम्रान यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्यात तीन शूटर्सचा सहभाग होता. या हल्ल्यात पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या अध्यक्षांच्या उजव्या पायाला गोळी लागली होती.