तुळजापूर – छत्रपती संभाजीराजे यांना तुळजापूर मंदिर संस्थानकडून गाभाऱ्यात दर्शन घेण्यासाठी अडवल्याने तुळजापूरकर प्रचंड संतापले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय आणि विविध संघटनांनी आज, गुरुवारी पुकारलेल्या तुळजापूर बंदला पूर्ण प्रतिसाद मिळाला आणि आज सकाळपासून तुळजापूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच संबधित अधिकाऱ्यांना निलंबित न केल्यास हा लढा संपूर्ण महाराष्ट्रात उभारू, असा इशाराही देण्यात आला आहे. तसेच ज्या नियमामुळे संभाजीराजेंना गाभाऱ्यात प्रवेश नाकारला, तो नियम छत्रपतींना लागूच होत नाही, असा युक्तिवाद आता करण्यात येत आहे.
आजच्या बंदला नागरिकांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला. तसेच मेडिकल दुकानदार, पेट्रोल पंप चालक, टपरीवाले, फळविक्रेते यांनी स्वतःहून आपली दुकाने बंद ठेवली होती. मात्र यामुळे परप्रांतातून आलेल्या भाविकांची खाण्या-पिण्याची मोठी गैरसोय झाली. परंतु भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून पुजारी वर्गाकडून मंदिर परिसरात नाश्त्याची सोय करण्यात आली होती. तसेच शहरात ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच दर्शनासाठी देवीच्या मंदिरात जाण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती.
छत्रपती संभाजीराजे हे सोमवारी संध्याकाळी कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना नियम सांगत व्यवस्थापनाने मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यापासून रोखले. यानंतर संभाजीराजेंनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला, मात्र तरीही त्यांना गाभाऱ्यात प्रवेश मिळाला नाही. यामुळे संभाजीराजे आणि शिवप्रेमी संतप्त झाले. छत्रपती घराण्यातील कोणीही सदस्य मंदिरात आले तर त्यांना भवानीच्या गाभाऱ्यात थेट प्रवेश दिला जातो. ही शेकडो वर्षांची परंपरा खंडित झाल्याने ग्रामस्थ संतापले. या प्रकाराबाबत मंदिर प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि मंदिर व्यवस्थापनाविरोधात शिवप्रेमी आणि नागरिकांनी बंदची हाक दिली. तसेच मंदिर संस्थान धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे, जिल्हाधिकारी, मंदिर तहसीलदार आणि व्यवस्थापक यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, मंदिर प्रशासनाने ज्या नियमांचा दाखला देऊन छत्रपती संभाजीराजेंना तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात जाण्यास मनाई केली होती ते छत्रपतींना लागूच होत नाहीत, असा युक्तिवाद आता होत आहे. देवुल ए कवायती कायदा कलम ३६ नुसार छत्रपतींना देवीच्या गाभाऱ्यात जाऊ दिले नव्हते. निजाम सरकारने १३३ वर्षांपूर्वी केलेल्या या कायद्यात १ ते ५६ नियम असून कलम ३६ हे पुजारी, ब्राम्हण, सेवेदार यांच्यासाठी आहे, गाभाऱ्यात गर्दी होऊ नये म्हणून हे कलम आहे. पाळीचा पुजारी व कमाईसदार हे गाभाऱ्यात थांबू शकतात, असा हा नियम आहे. हा नियम छत्रपतींना लागू होत नाही, असे नागनाथ भाऊ भांजी पुजारी यांनी म्हटले आहे.