कोल्हापूर : दक्षिण आफ्रिकेतून मालवी आंबा थेट कोल्हापूरच्या बाजार समितीत दाखल झाला आहे. कोल्हापूरच्या मार्केटमध्ये आंब्याच्या वीस पेट्या दाखल झाल्या आहेत.डझनला 4 हजार 500 रुपये दराने या आंब्याची विक्री सुरु आहे. आंब्याची पेटी बाजारात आल्याने आनंद व्यक्त होत असून एका आंब्याला 375 रुपये मोजावे लागणार आहेत.
कोल्हापूरात पहिल्यांदाच नोव्हेंबर महिन्यात आंबा बाजारात आल्याने आंबाप्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे.यंदा वातावरणातील बदलामुळे तळकोकणात आंब्याला मोहोर उशीरा आल्याने यंदा आंबा बाजारात उशीरा दाखल होण्याची शक्यता आहे.मात्र काही दिवसांपूर्वी कोकणातील आंब्याची पहिली पेटी नवी मुंबईमधील वाशी मार्केटमध्ये दाखल झाली.नोव्हेंबर महिन्यातच आंबा दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केल जात आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी कोकणात अवकाळी पावसाचा फटका आंबा बागायतदारांना बसला आहे.रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातही अवकाळीचा फटका आंबा बागायतदारांना बसला. आंब्याला मोहोर लागला आहे. तो पावसामुळे गळून पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.