मुंबई- गर्दीच्या ठिकाणी प्रामुख्याने ट्रेनमध्ये फोन चोरी करणार्या चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यातच माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे सिद्धेश्वर एक्स्प्रेसने मुंबईला येत असताना त्यांचा मोबाईल फोन चोरी करण्याचा प्रयत्न एका चोरट्याने केला. त्याला चोरी करत असताना शिंदे यांनी पाहिले आणि त्यांच्या बरोबर असलेल्या कॉन्स्टेबलने आरोपीला रंगेहाथ पकडले. आरोपी सोलापूर ग्रामपंचायतीतील राष्ट्रवादीच्या सदस्याचा मुलगा असल्याचे समोर आले आहे.
गुरुवारी सकाळी दादर स्थानकावर मोबाईल चोरट्यांचा फटका केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना बसला. मात्र, शिंदे यांच्या प्रसंगावधानामुळे त्यांनी चोराला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.आरोपी सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील घाटने गावचा रहिवासी आहे. महत्त्वाचे म्हणजे, सुशीलकुमार शिंदे हेसुद्धा सोलापूरचेच आहेत. त्यामुळे चोराने जाणीवपूर्वक त्यांचा पाठलाग करून मोबाईल चोरला का याबाबत पोलीस तपास करत आहेत. आरोपीचे नाव मंदार प्रमोद गुरव असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. ग्रामपंचायत सदस्याच्या पुत्राने हे कृत्य का केले याचा तपास पोलीस घेत आहेत.
दरम्यान, सुशीलकुमार शिंदे यांनी केलेले एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहेत . ते म्हणाले की, गुजराती समाजाला आरक्षण दिले कारण माझा जावईही गुजराती असल्यामुळे मला ते करावे लागले. जावयाला सांभाळायचे म्हटल्यावर हे सगळे करावे लागते. हे सगळे केल्यामुळे मी तिथे पुन्हा निवडून आलो. साधी गोष्ट नव्हती. पण आता हळूहळू माझ्या मतदारसंघातील नागरिक मला विसरून चाललेत असे विधान गुजराती मित्रा मंडळाच्या कार्यक्रमादरम्यान सुशीलकुमार शिंदे यांनी केले.