दापोली – रत्नागिरीत पुन्हा एकदा शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले.दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी मंत्री रामदास कदम विरुद्ध पालकमंत्री अनिल परब यांच्यातील वाद पहायला मिळाला.मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य आघाडी करण्यावर ठाम राहिल्याने दोघांमध्ये अडीच- अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला आणि पहिले नगराध्यक्षपद शिवसेनेच्या ममता मोरे यांना मिळाले. यामध्ये अनिल परब गटाची सरशी झाल्याने रामदास कदम यांच्या गटासाठी हा एक मोठा धक्का असल्याचेही बोलले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगरपंचायत नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या ममता मोरे तर उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक खालिद रखांगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. शिवसेनेच्या ममता मोरे यांच्या विरोधात शिवसेनेच्या नगरसेविका शिवानी खानविलकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक अटीतटीची बनली होती. परंतु शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सदस्य आघाडीवर ठाम होते, त्यामुळे शिवानी खानविलकर यांनी नगराध्यक्षपदासाठी भरलेला उमेदवारी अर्ज कुचकामी ठरला.शिवसेनेचे बंडखोर अपक्ष नगरसेवक यांच्या पाठिंब्यावर शिवानी खानविलकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु त्यांना बहुमत गाठणे शक्य झाले नाही. त्यातच शिवसेनेने व्हीप काढला होता. त्यातच शिवसेनेच्या तिकिटावर पहिल्यांदाच नगरसेविका बनलेल्या युवा नगरसेविका शिवानी खानविलकर यांनी राजकीय कारकिर्दीच्या नमनालाच पक्षाविरोधात बंड केल्याने शिवसेनेत अंतर्गत धुसफूस दिसू लागली होती.माजी मंत्री रामदास कदम व जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्यातील वादामुळे हे निवडणुकीत दोन गट पडले होते.विद्यमान आमदार योगेश कदम यांना मान्य आधीपासून आघाडी मान्य नसल्याने त्यांच्या समर्थकांनी शिवसेना उमेदवाराविरोधात बंडखोरी करून निवडणूक लढविली होती.तरीही लोकांनी आघाडीला स्पष्ट बहुमत दिले आहे आणि नगराध्यक्ष निवडणुकीतही हे बहुमत कायम दिसून आले.