संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 24 March 2023

दिनविशेष : जादूगार रघुवीर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

आज जादूगार रघुवीर यांचा जन्मदिन. त्यांचा जन्म २४ मे १९२४ रोजीचा. रघुवीर भिकाजी भोपळे हे नाव ऐकल्यावर आपल्यापैकी अनेकांना ‘कोण हे रघुवीर भिकाजी भोपळे?’ असा प्रश्न पडू शकेल… मात्र, ‘जादूगार रघुवीर’ हे नाव घेतलं की येणारा प्रतिसाद मात्र नक्कीच वेगळा असेल!… त्याचं कारणही तसंच आहे. आपली उभी हयात ज्यांनी जादू या कलेच्या संवर्धनासाठीच दिली, अशा एका महान जादुगाराची ही ओळख आहे. जादूचे प्रयोग हा आबालवृद्धांच्या उत्सुकतेचा विषय. जादूगार रघुवीर हे त्यातील महत्त्वाचे प्रसिद्ध प्रस्थ. डोळे बांधून रस्त्यावर मोटरसायकल चालविणे, स्वप्नसृष्टी, नोटांचा पाऊस, हातातून वीजनिर्मिती, भुतांचा नाच इ. त्यांचे प्रयोग करणारे जादुगार रघुवीर हे आम्हाला आमच्या लहानपणी म्हणजे अवलिया वाटायचा.

जादूगार रघुवीर हे मूळचे चाकणजवळील आंबेठाणचे. घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे रघुवीर पुण्यामध्ये आले आणि त्या वेळच्या अनाथ विद्यार्थी गृहामध्ये माधुकरी मागून त्यांनी शिक्षण घेतले. एकदा रस्त्याने जात असताना राणा या राजस्थानी कलाकाराला त्यांनी जादूचे खेळ करताना पाहिले. त्यांच्याकडून जादूची ही कला रघुवीर यांनी आत्मसात केली आणि ७५ वर्षांपूर्वी पहिला व्यावसायिक प्रयोग केला. गानहिरा हिराबाई बडोदेकर यांनी जादूगार रघुवीर यांना परदेश दौऱ्यावर नेले आणि तेथून त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. जादूच्या कलेमुळे जगभरातील २७ देशांचा प्रवास केला असला, तरी पुणे ही जादूगार रघुवीर यांनी आपली कर्मभूमी मानली. आपल्या हयातीमध्ये त्यांनी ७ हजार २३ प्रयोग केले. जादू हा तंत्रमंत्र नाही तर ती हातचलाखी आहे, हे ठसवताना त्यांनी प्रयोगांच्या माध्यमातून जनजागरण केले. ३६५ दिवसांत २०० प्रयोग व तेही हाऊसफुल्ल, असे विक्रम त्यांच्या नावावर लागले. जादू या कलेला त्यांनी वेगवेगळ्या सन्मानांनी गाजवत ठेवले. अनेक गावांतील मंदिरे, शाळा, हॉल, तालमीच्या बांधकामांसाठी निधी मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले कार्यक्रम अक्षरशः फुकट दिले. करणुकीसाठी घराघरांत शंभर चॅनेल पोचली, तरी त्यांच्या जादूचे आकर्षण कायम राहिले. त्यांनी पण साधी, सोपी उदाहरणे, साधी, सोपी भाषा यातून त्यांनी जादूचे खेळ चालू ठेवले. जादू हा चमत्कार नाही ती हातचलाखी आहे, असे स्पष्ट करूनच ते खेळाला सुरवात करायचे. हातचलाखी इतकी जबरदस्त, की लोक त्यांना मांत्रिक-तांत्रिकच समजायचे. भेटून आपल्या खासगी अडचणी सांगायचे. रघुविरांनी बऱ्याच प्रयत्नांनी चित्र बदलले. जादू या कलेला मोठ्या रंगमंचावर आणले. जादूचे खेळ खिशातील चिल्लर पैसे टाकून नव्हे तर आधी तिकीट काढून पाहायचे असतात, असे नवे चित्र त्यांनी निर्माण केले. त्यांनी अंतरराष्ट्रीय स्तरावर जादुगार म्हणून कीर्ती मिळविली. निखळ करमणूक हे सूत्र ठेवून रघुवीरांनी अनेक वर्षे अबालवृद्धावर अक्षरशः जादू केली. निरनिराळ्या शाळांतून जादूविद्येवर व्याख्याने देऊन त्यांनी तिचा प्रचार केला. त्यांची जादूची शाळा नावाची एक संस्था पुण्यात आहे. जादुगार रघुवीर यांचे निधन २० ऑगस्ट १९८४ साली झाले. सध्या रघुवीर घराण्यातील शिलेदार जादूगार जितेंद्र व विजय, जितेंद्र यांचा मुलगा ईशान आपली कला देशा विदेशात सादर करीत आहेत.

– संजीव वेलणकर
९४२२३०१७३३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

आजचे हवामान
ताज्या बातम्या