आज राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते आशिष विद्यार्थी यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १९ जून १९६२ केरळ मधील कन्नूर येथे झाला. राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते आशीष विद्यार्थी यांना सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका साकारण्यासाठी ओळखले जाते. ‘द्रोहकाल’ या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याच्या श्रेणीत राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. आशीष यांना विद्यार्थी हे आडनाव त्यांच्या वडिलांकडून मिळाले.
आशीष यांचे वडील गोविंद विद्यार्थी यांनी हे आडनाव फ्रीडम फाइटर गणेश शंकर विद्यार्थी यांना ट्रिब्युट देण्यासाठी ठेवले होते. वडील गोविंद विद्यार्थी हे मल्याळम रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेते आहेत. आशीष यांच्या मातोश्री रेबा या बंगाली असून कत्थक डान्सर आहेत. साऊथ सिनेमांसोबतच अनेक हिंदी सिनेमांत काम करणारे आशीष विद्यार्थी यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात रंगभूमीवरुन केली. रंगभूमीवर त्यांनी बरेच काम केले. मात्र त्यांना पहिल्यांदा ओळख सई परांजपेंच्या हम पंछी एक चाल के’ या कॉमेडी मालिकेतून मिळाली. त्यानंतर त्यांनी रिजनल टीव्हीवर आणखी काही मालिकांत काम केले. पुढे त्यांना ‘आनंद’ या कन्नड सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. १९८६ साली रिलीज झालेला हा त्यांचा डेब्यू सिनेमा होता. त्यानंतर त्यांनी ‘हायजॅक’ या मल्याळम सिनेमात काम केले.
सिनेमांमध्ये प्रत्येकवेळी खलनायकाची भूमिका वेगळ्या पद्धतीने साकारणारे आशीष विद्यार्थी यांनी एकदा एका मुलाखतीत सांगितले होते, की कधी कधी दिग्दर्शकसुद्धा विचारात पडतात, की यावेळी या खलनायकाला कसे मारावे, त्यासाठी कोणती पद्धत वापरावी. आशीष यांच्या मते, प्रत्येक वेळी निगेटीव्ह भूमिका साकारताना त्यांना जीवनात बरेच काही शिकायला मिळाले आहे. आशीष विद्यार्थी यांनी प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री शकुंतला बरुआ यांची मुलगी राजोशी बरुआसोबत लग्न केले. राजोशी यादेखील टीव्ही अभिनेत्री असून बंगाली आहेत. त्यांना ‘सुहानी सी एक लडकी’ या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली.
संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३