नवी दिल्ली – राजधानी दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील सर्व्हर अचानक बंद झाल्याने रुग्ण नोंदणी आणि नमुना संकलनाची काल रात्रीपासून प्रक्रिया ठप्प झाली. त्यामुळे तेथे रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. हा सायबर हल्ला आहे काय? हे पाहण्यासाठी केंद्रीय सायबर यंत्रणा आणि इतर गुप्तचर यंत्रणा तपास करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या.
रुग्णालय प्रशासनाने सांगितले की,‘एम्स रुग्णालयात वापरल्या जाणाऱ्या नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरच्या ई-हॉस्पिटलचा सर्व्हर डाऊन झाला होता, ज्यामुळे स्मार्ट लॅब, बिलिंग, अहवाल तयार करणे, अपॉइंटमेंट सिस्टम इत्यादींसह अनेक सेवा प्रभावित झाल्या आहेत. यासर्व सेवा सध्या मॅन्युअल मोडवर चालत आहेत.` याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून एम्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा मोठा सायबर हल्ला असल्याची शंका उपस्थित करत सरकारी पातळीवर प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. डिजिटल सेवा पुनर्संचयित करण्यासाठी पावले उचलली जात आहेत आणि इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम आणि एनआयसीची मदत घेतली जात आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा टाळण्यासाठी एम्स आणि एनआयसीकडून योग्य ती खबरदारी घेतली जाईल, असे एम्स रुग्णालयाने सांगितले.