नवी दिल्ली – दिल्लीतील जामा मशिदीमध्ये एकटी मुलगी अथवा मुलींच्या समुहास प्रवेशबंदीचा नवा फतवा जामा मशिद व्यवस्थापनाने जाहीर केल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार म्हणजे भारताचा सिरिया बनविण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेने केला.
देशाची राजधानी दिल्लीतील पुरानी दिल्ली परिसरामध्ये ऐतिहासिक अशी जामा मशिद स्थित असून ही मशिद मुस्लिम धर्मियांसाठी महत्वाची असून दिल्लीत येणारे पर्यटकदेखील येथे भेट देत असतात. मात्र, आता जामा मशिदीच्या व्यवस्थापनाने महिलांचा अपमान करणारा नवा फतवा जारी केला आहे. फतव्यानुसार जामा मशिदीमध्ये ‘एकटी` मुलगी अथवा मुलींच्या समुहास प्रवेश बंदी करण्यात आली असून देवनागरी आणि उर्दूमध्ये लिहिलेल्या या फतव्याची धातुची पट्टी जामा मशिदीच्या तीन प्रवेशद्वारांवर लावण्यात आली आहे. या प्रकारामुळे विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी आक्रमक झाले आहे. भारताचा सिरिया बनवत आहात काय ? असा आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.