नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सतत विषारी होत गेलेल्या राजधानी दिल्लीतील प्रदूषित हवेची गुणवत्ता 7 नोव्हेंबर पासून सकाळी किंचित सुधारली. त्यानंतर दिल्ली सरकारने प्रदूषणामुळे घातलेले निर्बंध मागे घेण्यात आले. त्यानुसार दिल्लीतील प्राथमिक शाळाही उद्यापासून पूर्ववत सुरु करण्यात येत आहे.
राजधानी दिल्लीतील वाढत्या हवा प्रदूषणामुळे अरविंद केजरीवाल सरकारने काही दिवसांपूर्वी लागू केलेले निर्बंध सोमवारी उठवले.उद्यापासून प्राथमिक शाळाही सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच दिल्लीत ट्रकच्या प्रवेशावरील बंदी उठवण्यात आली असून ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याच्या सूचनाही रद्द करण्यात आल्याचे दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी सांगितले. याशिवाय महामार्ग, रस्ते, उड्डाणपूल, ओव्हरब्रिज, पाईपलाईन, वीज यासंबंधीच्या बांधकामावरील बंदी हटवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, खासगी तोडफोड आणि बांधकामांवर बंदी आणखी काही दिवस राहणार असल्याचे पर्यावरणमंत्र्यांनी सांगितले.