नवी दिल्ली- भाजपाविरोधात जोरदार संघर्ष करुन आज आम आदमी पक्षाने दिल्ली महापालिकेच्या महापौरपदावर कब्जा केला. आज झालेल्या निवडणुकीत आपच्या उमेदवार शैली ओबेरॉय यांनी भाजपच्या रेखा गुप्ता यांचा पराभव केला. शैली यांच्या विजयामुळे १५ वर्षांनंतर एमसीडी मधील भाजपची सत्ता गेली आहे. या विजयानंतर ‘गुंडे हार गये, जनता जीत गयी’ असे ट्विट आपचे नेते मनीष सिसोदिया यांनी केले. शैली यांच्या रुपाने दिल्ली महापालिकेला १० वर्षांनंतर महिला महापौर लाभला आहे.
या निवडणुकीत एकूण 241 नगरसेवकांनी मतदान केले. यात शैली ओबेरॉय यांना 150 मते मिळाली. त्यांनी भाजपच्या रेखा गुप्ता यांचा 34 मतांनी पराभव केला. तिसऱ्या उमेदवार म्हणून आपच्या आशु ठाकूरही रिंगणात होत्या. त्याचवेळी काँग्रेसच्या 9 नगरसेवकांनी निवडणुकीत सहभाग घेतला नव्हता. आपचे 151 नगरसेवक असून त्यापैकी 134 निवडून आले. 13 आमदार,3 खासदार आणि एक अपक्ष नगरसेवकाने पाठिंबा दिला. भाजपच्या बाजूने 112 नगरसेवक असून, त्यापैकी 104 नगरसेवक निवडून आले. 6 खासदार आणि 1 आमदार होते. 250 जागांच्या सभागृहात महापौरपदासाठी 138 मतांची गरज होती.
याआधी तीन वेळा महापौरपदाची निवडणूक घेण्याचा प्रयत्न झाला, मात्र भाजप आणि आप सदस्यांच्या गदारोळामुळे ती होऊ शकली नाही. उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांनी एमसीडीच्या 10 नामनिर्देशित सदस्यांना मतदान करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भाजपचे पारडे जड झाले होते. याविरोधात आपच्या महापौरपदाच्या उमेदवार शैली ओबेरॉय यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 17 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने आपच्या बाजूने निकाल दिला.