नवी दिल्ली – आज देशातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी बर्फवृष्टी झाली आहे. आज बुधवारी पहाटे राजधानी दिल्लीत आणि एनसीआरमध्ये मुसळधार पावसाने दणका दिला. आज पहाटे ४ वाजल्यापासून दिल्ली, नोएडा, गाजियाबाद, गुरुग्राम, फरीदाबादसह अनेक शहरांमध्ये सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात काहीशी थंडी पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.
यादरम्यान, कमाल तापमानात ४ अंशांपर्यंत घसरण होण्याचा अंदाज आहे. त्याच वेळी, हवामान निरीक्षण वेबसाइट स्कायमेट वेदरनेदेखील आज सकाळी दिल्लीसह पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला होता. जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादमध्ये आज बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये विखुरलेल्या पावसासह बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेशमध्ये गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्यानुसार, पूर्व उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये पावसाची शक्यता आहे. पश्चिम उत्तर प्रदेशात एकाकी गारपिटीची शक्यता आहे. उद्या, १० फेब्रुवारी रोजी पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, झारखंड आणि उत्तर ओडिशामध्ये विखुरलेल्या पावसाचा अंदाज आहे. तर पूर्व उत्तर प्रदेशच्या विविध भागांमध्ये थंडीची स्थिती निर्माण होऊ शकते.