नवी दिल्ली : दिल्ली महापालिका निवडणुकीत नुकत्याच झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहितीसमोर आली आहे. आदेश गुप्ता यांनी आपला राजीनामा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडे पाठवल्यानंतर जेपी नड्डा यांनी आदेश गुप्ता यांचा राजीनामा स्वीकारला असल्याचेही समजते.
आदेश गुप्ता यांनी दिल्ली भाजप अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी वीरेंद्र सचदेवा कार्याध्यक्ष असतील. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या सूचनेनुसार आदेश गुप्ता यांचा दिल्ली प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारण्यात आला असल्याचे भाजपने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. दिल्ली एमसीडी निवडणुकीत आम आदमी पार्टीला १३४, भाजपला १०४, काँग्रेसला ९आणि इतरांना ३ जागा मिळाल्या आहेत. एमसीडीमध्ये गेली १५ वर्षे सत्तेत असलेल्या भाजपला आम आदमी पक्षाकडून दारूण पराभव पत्करावा लागला, यामुळेच आदेश गुप्ता यांनी पदाचा राजीनामा दिला. आदेश गुप्ता यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडे राजीनामा सोपवला असून, त्यांनीही राजीनामा स्विकारला आहे.