नवी दिल्ली :- दिल्लीतील महापौरपदाच्या निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. या याचिकेत ‘आप’ने सर्वोच्च न्यायालयासमोर पाच मागण्या ठेवल्या होत्या. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने उपराज्यपाल, पीठासीन अधिकारी, कॉर्पोरेशन आयुक्त आणि दिल्ली सरकारला नोटीस बजावण्यात आली. आता या प्रकरणावर पुढील सुनावणी १३ फेब्रुवारीला होईल.
आम आदमी पक्षातर्फे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला की, विधानसभा अध्यक्ष हे वरिष्ठ नसतात. विधानसभा अध्यक्ष सत्य शर्मा हे पीठासीन अधिकारी आहेत. ‘आप’च्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीचे नायब राज्यपाल, दिल्ली सरकार, एमसीडी यांना नोटीस बजावली असून सोमवारपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे.
‘आप’च्या पाच मागण्या
सत्य शर्मा यांना पीठासीन अधिकारी पदावरून हटवावे, एमसीडीचे सभागृह आठवडाभरात बोलावण्यात यावे, महापौर निवडणूक पूर्ण होईपर्यंत कोणतेहीकामकाज तहकूब करू नये, उर्वरित निवडणुका महापौरांच्या अध्यक्षतेखाली घ्याव्यात, नामनिर्देशित नगरसेवकांना मत देण्याचा अधिकार मिळत नाही.