पुणे – तब्बल पाच दशके बजाज उद्योग समूहाची धुरा वाहून, देशाच्या उद्योग क्षेत्रावर आपल्या कर्तबगारीचा ठसा उमटवणारे जेष्ठ उद्योगपती, राहुल बजाज यांच्या पार्थिवावर आज पुण्याच्या वैकुंठ स्मशान भूमीत संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राहुल बजाज यांचे शनिवारी पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात हृदयविकार आणि न्युमोनियाच्या आजाराने दुखद निधन झाले होते.
आज दिवंगत बजाज यांचे पार्थिव त्यांच्या आकुर्डी येथील बजाज कंपनीच्या निवासस्थानी आणण्यात आले. तेथे ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि दिवंगत बजाज यांचे जवळचे मित्र शरद पवार यांनी बजाज यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि श्रद्धांजली वाहिली तसेच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले, सातारचे राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील, खासदार श्रीरंग बारणे सेनेचे सरचिटणीस मिलिंद नार्वेकर यांच्यासह विविध पक्षांचे पुण्यातील राजकीय नेते तसेच बजाज उद्योग समूहातील अधिकारी कर्मचारी आदींनी बजाज यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी बजाजच्या कर्मचार्यांना अश्रू अनावर झाले होते. त्यानंतर चारच्या सुमारास त्यांची अंत्ययात्र निघाली आणि सायंकाळी पाच वाजता पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पार्थिवाला त्यांचे पुत्र राजीव बजाज यांनी मंत्राग्नी दिला आणि एक महान उद्योजक काळाच्या पडद्याआड झाले. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील छगन भुजबळ योग गुरु रामदेव आदी मान्यवरांसह बजाजचे कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.