रत्नागिरी- गानसम्राज्ञी लतादीदींना आदरांजली वाहण्यासाठी दीनानाथ मंगेशकरांच्या नावाने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.
उदय सामंत म्हणाले की, गानसम्राज्ञी म्हणून त्यांनी आपले स्थान अवघ्या विश्वात निर्माण केले. त्यांच्या जाण्यामुळे फार मोठी पोकळी सांस्कृतिक विश्वात निर्माण झाली आहे. दीनानाथ मंगेशकरांच्या नावाने आंतरराष्ट्रीय महाविद्यालय सुरु करण्याचे स्वप्न होते. त्या संबंधित खात्याचा मंत्री म्हणून मी पाठपुरावाही करत होतो.
महाविद्यालयाची रचना कशी असली पाहिजे याबाबत लतादीदींसोबत अनेकवेळा फोन करून चर्चा होत होती. खरच एक संवेदनशील व्यक्तीमत्व भारताने गमावले आहे. मात्र एक निश्चित झाले होते, कोरोना संपल्यावर त्यांना भेटणार होतो. संगीत महाविद्यालयाविषयीच्या संकल्पना त्या मला सांगणार होत्या. मात्र नियतीला ते मान्य नव्हते. पुढील काही दिवसात दीनानाथ मंगेशकरांच्या नावाने संगीत महाविद्यालय उभे करून खर्या अर्थाने आदरांजली वाहणार आहोत असे सामंत यांनी स्पष्ट केले.