हैदराबाद – बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हिला हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तिच्या चाहत्यांच्या जणू काळजाचा ठोकाच चुकला. आपल्या आगामी ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी शहरात आलेल्या दीपिकाला रविवारी हृदयाचे ठोके वाढल्याने अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर तातडीने तिला कामिनेनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे तिच्या विविध चाचण्या झाल्या. पूर्ण उपचारांनंतर आता दीपिका पुन्हा एकदा चित्रीकरणात सहभागी झाली आहे. ती तिच्या आगामी चित्रपटासाठी रामोजी फिल्म सिटीच्या सेटवर परतली.
‘प्रोजेक्ट के’ हा दीपिकाचा तेलुगू सुपरस्टार प्रभाससोबतचा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन यांचीही प्रमुख भूमिका असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते नाग अश्विन हे करत असून चित्रपट वैजयंती मूव्हीज निर्मित आहे. तब्बल ५०० कोटी रुपयांच्या बजेटचा हा चित्रपट २०२३ मध्ये कधीही चित्रपटगृहात दाखल होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, ‘दीपिकाला हे पात्र साकारताना पाहून मी खूप उत्सुक आहे. हे असे काहीतरी आहे जे याआधी कोणत्याही आघाडीच्या अभिनेत्रीने केले नाही आणि प्रत्येकासाठी हे आश्चर्यकारक असेल. दीपिका आणि प्रभासची जोडी चित्रपटातील मुख्य आकर्षणांपैकी एक असेल आणि मला विश्वास आहे की त्यांच्यातील कथा प्रेक्षक आपल्या हृदयात पुढील अनेक वर्षे जपून ठेवतील’, असे चित्रपट निर्माते नाग अश्विन यांनी सांगितले. त्यामुळे चित्रपटाबाबत आणि दीपिकाच्या भूमिकेबाबत उत्सुकता आणखी वाढली आहे. त्याचबरोबर दीपिका हृतिक रोशन आणि शाहरुख खान यांच्यासोबत अनुक्रमे ‘फायटर’ आणि ‘पठाण’मध्येही दिसणार आहे. गेल्याच महिन्यात, अभिनेत्रीने ७५व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये जबरदस्त हजेरी लावून सर्वांना चकित केले होते.