रत्नागिरी – दुरुस्तीच्या कामासाठी ४ दिवसांपूर्वी संगमेश्वरचे उमरे धरण रिकामे केले आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता धरणातील पाणी नदीत सोडल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. त्यात काही लोकांचे कपडे आणि इतर वस्तू वाहून गेल्या. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. उन्हाळ्यात धरण रिकामे केल्यामुळे तालुक्यातील १० गावांवर पिण्याच्या पाण्याचे संकट घोंगावत आहे. पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागणार आहे.
रत्नागिरीच्या उमरे धरणाची दुरूस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे धरणातील जलसाठा कमी केला आहे. हे पाणी ३-४ दिवस पुरेल. या धरणातून उमरे प्रादेशिक नळपाणी योजना राबवली जाते. उमरे, कळंबस्ते, हाकरवणे, भीमनगर, मलदेवाडी, भेकरेवाडी, कोंडउमरे, फणसवणे, अंत्रवली, आदी गावांचा पाणीपुरवठा त्यावर अवलंबून आहे. धरणाच्या भिंतीला गळती लागल्याने तिच्या दुरुस्तीची आवश्यकता आहे. म्हणून धरणातील पाणीसाठा कमी केला आहे. या गावांना २ ते ३ दिवस पुरेल एवढेच पाणी धरणात आहे. त्यामुळे त्यांच्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे.