मुंबई : राज्यात किल्ल्यांचे संवर्धन होण्यासाठी दुर्गविकास प्राधिकरण स्थापन होणार असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत आणि युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्यामध्ये सोमवारी याबाबत दोन तास चर्चा झाली.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील दुर्ग प्राधिकरण स्थापन करण्यासाठी अनुकूल असल्याची माहिती सामंत यांनी दिली.
राज्यातील ऐतिहासिक वारसा असणारे गडकिल्ले यांचे संवर्धन होण्यासाठी तज्ज्ञांची समितीदेखील स्थापन करण्यात आली होती. यामध्ये संभाजीराजे यांचाही समावेश होता.त्यानंतर आता दुर्गविकास प्राधिकरण स्थापन करण्याबाबत उदय सामंत आणि संभाजीराजे यांची बैठक पार पडली. याबाबत सामंत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी त्यांचे जतन करणे ही काळाची गरज बनलेली आहे. यासाठी संभाजीराजे यांची शासनाने काहीतरी निर्णय घ्यावा अशी मागणी होती. सोमवारी त्यांच्यासोबत दुर्गविकास प्राधिकरणाबाबत प्राथमिक बैठक झाली. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महिन्यापूर्वी दुर्गप्राधिकरण स्थापन करण्याबाबत सुतोवाच केले होते. सोमवारी झालेल्या बैठीकीत कशीपद्धतीने दुर्गविकास प्राधिकरण असावे, कशापद्धतीने किल्ल्यांचा विकास करु शकतो अशी महाराष्ट्रातल्या किल्ल्यांबाबतच चर्चा झाली. याबाबत मुख्यमंत्र्यांशीसुद्धा चर्चा झाली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही काही दिवसांत चर्चा करणार आहोत.त्यामुळे दुर्गविकास प्राधिकरण स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनी मान्यता दिली असल्याची माहिती सामंतांनी दिली.