कल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्या मराठा आरमाराची उभारणी केलेल्या कल्याणच्या दुर्गाडी बंदरात आता पुन्हा एकदा आरमारी सामर्थ्याचे महत्त्व अधोरेखित होणार आहे. छत्रपती शिवरायांच्या ध्वजाचा वारसा लाभलेल्या भारतीय नौदलातील वेगवान युद्धनौका आता दुर्गाडी किल्ल्याजवळ उभारण्यात येणार आहे. नौदल अधिकारी आणि पालिका अधिकाऱ्यांनी यासंबंधीच्या करारावर सह्या केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा नौदलाच्या स्थापनेच्या ३६५ व्य वर्धापन दिनानिमित्त हा करार करण्यात आला. अतिवेगवान श्रेणीतील युद्धनौकेचे हे राज्यातील पहिले स्मारक असेल.
मिळालेल्या माहितिनुसार, नौदलाच्या ताफ्यातून ऑक्टोबर २०२१मध्ये निवृत्त केलेली ‘टी-८०’हीयुद्धनौका स्मारकरूपात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून दुर्गाडी आरमार संग्रहालयात उभारणार असून, नौदल अधिकारी आणि पालिका अधिकाऱ्यांनी यासंबंधीच्या करारावर सह्या केल्या आहेत. याखेरीज २.५ किमी लांबीच्या नदीकिनारी असलेल्या चार एकर परिसरात पाणबुडीची प्रतिकृती असलेली नौदल गॅलरीही उभारली जाणार आहे. यामुळे नौदलात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली संधी ठरणार आहे.या तर युद्धनौकेचे हे राज्यातील पहिले स्मार असून, कल्याण शहरातील एक अनोखे प्रेक्षणीय स्थळ म्हणून याकडे पहिले जाणार आहे.
दरम्यान, कल्याणचे तत्कालीन पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ‘हेरीटेज कॅम्पस’ उभारण्याची कल्पना मांडली होती. कल्याणचा प्राचीन इतिहास लक्षात घेता तत्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजनही करण्यात आले होते. या प्रकल्पाला अखेर यश आले आहे. येथे साकारल्या जाणाऱ्या नेव्हल गॅलरीत प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत राज्याचा समृद्ध सागरी इतिहास मांडला जाणार आहे. हा प्रकल्प साकार व्हावा यासाठी नौदल अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करण्याबरोबरच अधिकाऱ्यांना विशाखापट्टणममधील संग्रहालयातील अभ्यासदौरे घडविले. यानंतर आता नौदल अधिकाऱ्यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करत युद्धनौका कल्याणात आणण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.