जयपूर – राजस्थानच्या कोटामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून इस्लामीकरण करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. बजरंग दलाने येथील इयत्ता दुसरीच्या पुस्तकावर आक्षेप घेतला असून विभागीय आयुक्त आणि जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली आहे. इंग्रजी माध्यमाच्या या पुस्तकातून आई-वडिलांना अम्मी आणि अब्बू बोलायला शिकवले जात असल्याचा आरोप आहे.
या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायात, ‘टू बिग टू स्मॉल’मध्ये आईसाठी ‘अम्मी’ आणि वडिलांसाठी ‘अब्बू’ या शब्दांचा उल्लेख आढळला आहे. तर, याच पुस्तकातील दुसर्या धड्याचे शीर्षक ‘दादा फारूकचे गार्डन’ असे आहे, ज्यामध्ये मुस्लिम पात्र अमीर आणि त्याचे आजोबा फारूक यांचे चित्रण आहे. तसेच सहाव्या धड्यात पान क्रमांक २० वर, पालक स्वयंपाकघरात बिर्याणी बनवत आहेत, असे सांगितले आहे. यावर मुस्लिम वगळता इतर धर्मीय विद्यार्थ्यांच्या पालकांनी आक्षेप घेतला असून आमच्या मुलांना आता मांसाहारी पदार्थ खावेसे वाटतात, ते आम्हाला बिर्याणी बनवायला सांगतात, मुले आता अब्बू आणि अम्मी बोलू लागली आहेत, अशा तक्रारी केल्या आहेत. याबाबत मुलांच्या कुटुंबीयांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना फोनवरून माहिती दिली होती.
बजरंग दलाचे सह-प्रांत संयोजक योगेश रेनवाल यांनी सांगितले, ‘१२ जुलै रोजी कोटामधील वेगवेगळ्या इंग्रजी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे फोन येत होते. त्यांच्या मुलांना शिकवल्या जाणाऱ्या पुस्तकात एकाच धर्माशीसंबंधित अधिकाधिक शब्दांचा समावेश आढळला असून हा धर्मप्रसार करण्याचा प्रयत्न असल्याचे ते सांगत होते. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मी दुकानातून ते इयत्ता दुसरीचे पुस्तक विकत घेतले ज्याचे नाव ‘गुलमोहर’ असे आहे. कॉन्व्हेंट शाळांमध्ये इस्लामीकरणासाठी अशा पुस्तकांमधून शिकवले जात असून त्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत. अशा पुस्तकांवर बंदी घातली पाहिजे’, असे रेणवाल यांनी सांगितले. तसेच अनेकांनी याबाबत ट्विटरवरून समाचार घेतला. राजस्थानच्या शाळेत मुस्लिम नसलेल्या विद्यार्थ्यांना अम्मी-अब्बू बोलायला का शिकवले जाते?’, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, ३५२ रुपये किंमतीचे हे पुस्तक हैदराबाद येथील एका प्रकाशनाचे आहे. त्यात एकूण ११३ पाने आहेत.