मुंबई – दूरदर्शनला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांनी नुकतंच एक स्नेहमेळ्याचं आयोजन केलं होतं. यावेळी याकूब सईद, अरुण काकतकर ही ज्येष्ठ मंडळी आवर्जून उपस्थित होती. एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते या दोघांचाही सन्मान करण्यात आला. याशिवाय नीना राऊत, किरण चित्रे, रविराज गंधे, माधवी कुलकर्णी, वासंती वर्तक, माधवी मुटाटकर, मीना गोखले, शिवाजी फुलसुंदर, जयू भाटकर, अजिंक्य नाईक आदी दूरदर्शनच्या वाटचालीत महत्त्वाचा वाटा उचलणारी मंडळी या स्नेहमेळ्याला खास उपस्थित होती. कार्यक्रमाची संकल्पना मुळ्येकाकांची असली तरी पूर्ण सोहळ्याचं आयोजन विनायक गवांदे आणि माधुरी गवांदे यांनी केलं होतं. प्रास्ताविकावेळी मुळ्येकाकांनी नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली.
यावेळी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी, तसंच मुंबई दूरदर्शनचा टॉवर उभारणाऱ्या कंपनीचे महेश मुद्दा आणि वोडाफोनचे वरिष्ठ अधिकारी भास्कर शिंदे हेही उपस्थित होते. गप्पाटप्पा आणि सुग्रास भोजन असा छोटेखानी कार्यक्रम सर्वांनाच आठवणींच्या हिंदोळ्यावर नेणारा होता. रंगभूमीवर १०० नाटकांच्या दिग्दर्शनाचा मोठा टप्पा गाठणारे ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरेंचा यावेळी खास सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता करताना दूरदर्शनचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यासाठी मुळ्येकाकांच्या हस्ते केकही कापण्यात आला.