नवी दिल्ली – देशभरात काही महिन्यांपासून नाचत असताना मृत्यू, व्यायाम करत असताना मृत्यू, भाषण करताना मृत्यू ,वरमाला घालताना वधूचा मृत्यू अशा अचानक मृत्यूच्या घटनांचे प्रमाण वाढलेले आहे.यामागे कोरोना विषाणू तर कारणीभूत नाही ना, अशी शंका आता एम्समधील डॉक्टरांसह आरोग्य विज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
अचानक मृत्यूच्या बहुतांश घटना या हृदयविकाराचा धक्का बसून किंवा कार्डियाक अरेस्टने झाल्या आहेत. अचानक मृत्यूच्या अनेक प्रकरणांमध्ये पूर्वी हृदयविकाराची कुठलीही लक्षणे जाणवली नव्हती, अशीही प्रकरणे आहेत. देशभरात त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. या घटनांमागे कोरोना व्हायरस तर नाही, अशी शंका आता घेतली जात आहे. अचानक होणार्या या मृत्यूंवर हृदयविकार तज्ज्ञही चिंता व्यक्त करत आहेत.
एम्समधील कार्डियोलॉजी तज्ज्ञ डॉ. राकेश यादव यांनी याबाबत सांगितले की, या घटनांचा सध्या कोणताही डेटा उपलब्ध नाही. घटनांचे स्वरूप पाहून त्यांचा संबंध कोरोना महामारीशी असू शकतो असे वाटते. इंडियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित यादव यांच्या एका लेखात सदृढ दिसणार्या व्यक्तीचाही कोरोना विषाणूमुळे मृत्यू होऊ शकतो,असे म्हटलेले होते.विषाणूसंसर्ग व हृदयाशी संबंधित आजारांच्या वाढत्या जोखमीचा संबंध दाखवणारे काही पुरावे समोर आले आहेत.