मुंबई – प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत करण्यात आलेल्या अवमानकारक वक्तव्यावरून अल-कायदा दहशतवादी संघटनेने भारतात हल्ला करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आता देशातील वेगवेगळ्या सरकारी आणि खासगी वेबसाईट्सवर सायबर हल्ले झाल्याचे कळते आहे. धक्कादायक म्हणजे या हल्ल्याचा मोठा फटका महाराष्ट्राला बसला असून हल्ले झालेल्या ७० भारतीय वेबसाईट्सपैकी ५० वेबसाईट्स महाराष्ट्रातील आहेत. अगदी नागपूरमधील शासकीय विज्ञान संस्थेच्या वेबसाईटचाही यात समावेश आहे. हॅक करण्यात आलेल्या अनेक वेबसाईट्सवर ‘आम्ही शांत बसणार नाही’, असा वादग्रस्त संदेश झळकत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ड्रॅगन फोर्स मलेशिया नावाच्या हॅकर्स ग्रुपने देशातील अनेक वेबसाईट्सवर हल्ले केले आहेत. यामध्ये इस्त्रायलमधील भारतीय दुतावासाच्या वेबसाईट, राष्ट्रीय शेती व्यवस्थापनाची वेबसाईट आणि कृषी संसोधन केंद्राच्या वेबसाईट्सचा समावेश आहे. या वेबसाईट्ससह इतर अनेक वेबसाईटवर सायबर हल्ले झाले आहेत. तसेच हॅकर्सने जगभरातील मुस्लीम हॅकर्सना भारतीय वेबसाईटवर सायबर हल्ले करण्यासाठी आवाहनही केले आहे. मानवी हक्कांसाठी लढणाऱ्यांनी या हल्ल्यात सहभागी व्हावे, असे ड्रॅगन फोर्स मलेशियाने म्हटले आहे.
तसेच १८७७ नावाने ओळखल्या जाणाऱ्या दुसर्या हॅकर्स ग्रुपनेही हल्ले केले होते. त्यांनी इतर पोर्टल्ससह महाराष्ट्रातील विधी अकादमीची वेबसाईट हॅक केली आहे. या वेबसाईटवर असा मेसेज दिसत होता की, ‘आम्हाला भारतीय लोकांशी कोणतीही अडचण नाही. ते त्यांचा धर्म निवडण्यास स्वतंत्र आहेत पण आम्ही त्यांना आमच्या धर्मावर आक्रमण करू देणार नाही. त्याचबरोबर अनेक वेबसाईट्सवर हॅकर्सने ऑडिओ नोट पोस्ट केली असून त्यात तुम्हाला ज्याप्रमाणे तुमचा धर्म आहे तसाच आमच्यासाठी आमचा धर्म आहे, असे वाक्य ऐकू येत आहे. दरम्यान, भारतातील इस्त्रायलच्या दुतावासाला वेबसाइट रिस्टोअर करण्यात रात्री उशीरा यश आले. मात्र त्यावरील काही पेजेसवर अद्यापही तांत्रिक अडचणी कायम आहेत.