संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 03 July 2022

देशातील पहिल्या वॉटर टॅक्सी सेवेला सुरुवात; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – बेलापूर येथून प्रत्येकी १० ते ३० प्रवासी क्षमता असलेल्या ७ स्पीडबोटी आणि ५६ प्रवासी क्षमता असलेली एक कॅटामरान बोट अशा एकूण ८ बोटींद्वारे पहिली वॉटर टॅक्सी सेवा सुरु करण्यात आली आहे. आज केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाईन उपस्थित होते. या सेवेमुळे बेलापूर येथून दक्षिण मुंबईत भाऊचा धक्का येथे पोहोचण्यास स्पीड बोटीने ३० मिनिटं तर कॅटामरान बोटीला ४५ ते ५० मिनिटांचा कालावधी लागणार आहे. स्पीडबोटीचं भाडे प्रति प्रवासी ८०० ते १२०० रुपये तर कॅटामरान बोटीकरीता प्रति प्रवासी २९० रुपये इतके ठेवण्यात आले आहे. ही बेलापूर येथून भाऊच्या धक्क्याबरोबरच एलिफंटा, जेएनपीटी या जलमार्गावरसुद्धा प्रवासी सेवा चालवण्यात येणार आहे.

या उद्घाटन प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, देशातील पहिली वॉटर टॅक्सी आज महाराष्ट्रात सुरु होत आहे. देशात पहिली रेल्वे सेवा मुंबई ठाणे दरम्यान सुरु झाली. त्यानंतर देशात त्याचे जाळे विस्तारले. समुद्राचा उपयोग फक्त सुर्योदय सुर्यास्त पाहण्यासाठी नाही. समुद्राचा उपयोग वाढला पाहिजे. आर्थिक विकासाची चळवळ गतिमान करतांना जलवाहतूक असेल किंवा अन्य काही त्याचा उपयोग वाढला पाहिजे. येत्या दोन तीन वर्षात समुद्राचे खारे पाणी आपण गोड करत आहोत. राजकरण राजकारणाच्या जागी असते. आपण लोकोपयोगी कामे करायला हवी, असा चिमटा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना काढला. 

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले की, नवी मुंबई ते दक्षिण मुंबईला जोडणाऱ्या या जलवाहतूक सेवेमुळे प्रवाशांचा वेळ वाचण्यास मदत होईल. रस्त्यावरची वाहतूक कोंडी कमी होईल. मुंबई ते अलिबाग रो रो सेवा सुरु झाली आहे. केंद्रीय नौवहन मंत्रालयाकडून सागरतटीय राज्यांच्या सहकार्याने बंदर विकास, मत्स्यव्यवसाय विकास, जेट्टीचे निर्माण, कौशल्य विकास आशा विविध प्रकल्पांवर काम सुरू आहे. सागरमाला कार्यक्रमातून जलद आर्थिक विकासाला चालना देण्यात येत आहे. १.०५ लाख कोटीचे १३१ प्रकल्प महाराष्ट्रासाठी निश्चित करण्यात आले आहेत. यात सागरमाला कार्यक्रमांतर्गत ४६ प्रकल्पास २७८ कोटीचे वित्तीय सहाय्य देण्यात येईल. मुंबई आणि महाराष्ट्राच्या सागरतटीय जिल्ह्यांना या प्रकल्पांचा लाभ होईल, असे ते म्हणाले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेयांनी मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाला   केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री कपिल पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे बंदर विकास मंत्री अस्लम शेख, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार डॉ. विनायक सहस्त्रबुद्धे, खासदार  कुमार केतकर, खासदार राजन विचारे, आमदार निरंजन डावखरे, आमदार रविंद्र फाटक, आमदार बाळाराम पाटील, आमदार रमेश पाटील, आमदार मंदा म्हात्रे, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा, मेरी टाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर,  यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami