संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 21 May 2022

धक्कादायक! मुलाला २२ कुत्र्यांसोबत कोंडले; पालकांवर गुन्हा दाखल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email
Print

पुणे – पुण्यातील कोंढवा भागात ११ वर्षांच्या मुलाला चक्क २२ कुत्र्यांसोबत डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलाचे आई-वडील संजय लोधरिया आणि शीतल लोधरिया यांच्याविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कुत्र्यांसोबत एका खोलीत हा किशोरवयीन मुलगा जवळपास दोन वर्षांपासून राहत होता.

कोंढवा येथील कृष्णाई इमारतीत लोधरिया कुटुंब वास्तव्यास आहेत. त्यांनी २२ कुत्री पाळली आहेत. कुत्र्यांमुळे त्रास होत असल्याची तसेच दुर्गंधी पसरत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. स्थानिक रहिवाशांनी अनेकदा या मुलाला खिडकीतून पाहिले होते. तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यांनी याबाबत ज्ञानदेवी चाइल्डलाइन या संस्थेला माहिती दिली. जी मुलांसाठी आपत्कालीन सेवा प्रदान करते. ज्ञानदेवी चाइल्डलाइनच्या अनुराधा सहस्रबुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी गेले असता ती खोली कुलूपबंद असल्याचे आढळून आले. मात्र मुलगा आणि कुत्रे खोलीच्या आत होते. तिथे त्यांना चार कुत्र्यांचे शवही सापडले. तसेच खोलीत प्राण्यांचे मलमूत्रही तसेच होते, अशा अतिशय घाणेरड्या परिस्थितीत त्या किशोरवयीन मुलाला डांबून ठेवण्यात आले होते. तसेच दोन वर्ष कुत्र्यांसोबत वास्तव्य केल्याने हा मुलगा कुत्र्यांप्रमाणेच वर्तन करत असल्याची धक्कादायक बाब या संस्थेच्या निर्दशनास आली.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांच्या एका विभागाकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नसल्याचा आरोप सहस्रबुद्धे यांनी केला आहे. त्या म्हणाल्या, कोंढवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांनी पोलीस कर्मचाऱ्यांना दरवाजा तोडून मुलाला वाचवण्यास सांगितले होते पण आमच्यासोबत आलेला पोलीस कर्मचारी तसे करण्यास टाळाटाळ करत होता. मग आमचे कार्यकर्ते मुलाच्या पालकांशी बोलल्यानंतर ते परत आले आणि मुलाच्या सुटकेसाठी वारंवार पोलिसांची मदत घेतल्यानंतर अखेर त्याची सुटका झाली. मंगळवारी संध्याकाळी या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला.

तर, या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोधरिया दाम्पत्य यापूर्वी सोसायटीतील रहिवासी आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार घेऊन आले होते. आम्ही कुत्र्यांचे पालनपोषण करतो असे त्यांचे म्हणणे होते. मात्र त्यांनी आपल्याच मुलाला २२ कुत्र्यांसोबत कोंडून ठेवले असल्याची तक्रार आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. हे दाम्पत्य विक्षिप्त असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच मुलाची वैद्यकीय तपासणी करून त्याचे समुपदेशन करण्यात येत असल्याचे कोंढवा पोलिसांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami