धुळे – शहराजवळ असणार्या अवधान गावात एकाच कुटुंबातील पाचजणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेचा आता मोहाडी पोलीस तपास करत आहेत. या सर्व पाचही जणांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. शिरपूर तालुक्यातील दहिवद येथे राहणारे गणेश रावळ गोपाळ हे रोजगारासाठी धुळ्याच्या औद्योगिक वसाहतीमध्ये आले होते. यासाठी त्यांनी अवधान गावात दौलत नगरमध्ये भाडेतत्त्वावर घर घेतले. आपल्या उद्योग व्यवसायामध्ये व्यस्त असणार्या या परिवारातील चार सदस्यांनी तसेच परिवारात राहणार्या एका युवकाने एकाच वेळी विष प्राशन केल्याची माहिती गोपाळ यांनी त्यांच्या घर मालकाला दिली.यानंतर शेजारी राहणार्या नागरिकांनी घरात पाहिले असता गणेश रावल गोपाळ (42),गोविंदा गणेश गोपाळ (12), जयश्री गणेश गोपाळ (14),सविता गणेश गोपाळ (35) व भरत पारधी (24) यांना त्रास होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे या सर्वांना तत्काळ रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले आहेत.