नांदेड – भोकर तालुक्यातील सोमठाणा येथे मांडव परतणीसाठी नवरीला माहेरी घेऊन जात असताना टाटा मॅजिक जीप आणि टेम्पो यांच्यात भीषण अपघात झाला. यात टाटा मॅजिक गाडीतील पाचजण जागीच ठार झाले. या अपघातात अवघ्या तीन दिवसांपूर्वी विवाहबद्ध झालेली नवरी आणि तिच्या भावाचा जागीच मृत्यू झाला. तर नवरदेव मृत्यूशी झुंज देत आहे. ही घटना काल, सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास भोकर-हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावर घडली असून या अपघातात अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
मॅजिक जीप ही नवरीच्या मांडव परतणीसाठी जारीकोट ता. धर्माबाद येथून साखरा ता. उमरखेड येथे जात होती. त्याचवेळी भोकर तालुक्यातील सोमठाणा शिवारात चटलावार यांच्या धाब्यासमोर हिमायतनगरकडून नांदेडकडे विटा वाहतूक करणाऱ्या टेम्पोने समोरून जीपला जोरात धडक दिली. या अपघातात नवरी पूजा ज्ञानेश्वर पामलवार (२१) रा. साखरा ता. उमरखेड, नवरीचा भाऊ दत्ता ज्ञानेश्वर पामलवार (२२), माधव पुरबाजी सोपेवाड (३०) रा. जांबगाव ता. उमरी, सुनिल दिंगाबर धोटे (२८) रा. चालगणी ता. उमरखेड (जीप चालक) आणि एका अज्ञाताचा मृत्यू झाला, तर नागेश साहेबराव कन्नेवार (२८) रा. जारीकोट, अविनाश संतोष वंकलवाड रा. तामसा, अभिनंदन मधुकर कसबे (१६) रा. वाजेगाव, सुनिता अविनाश तोपलवार (३५) रा. तामसा यांच्यासह अनेकजण गंभीर जखमी झाले. जखमींना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.