मुंबई – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कार्यालयात चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी साधारण ६ वाजताच्या सुमारास नवाब मलिक यांच्या घरी धडक दिली. त्याठिकाणी त्यांची तासभर चौकशी केल्यानंतर साडे सात वाजता अधिकारी मालिकांना घेऊन ईडी कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर साडे आठ वाजल्यापासून मालिकांची चौकशी सुरू झाली.
यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली असून ‘नवाब मलिक यांच्यावर राग काढण्याचे काम कदाचित चालू झालेले दिसत आहे’, अशी टीका त्यांनी केली. ते म्हणाले, ‘हा सत्तेचा दुरुपयोग करण्याचा आणखी एक प्रकार आहे, पहाटे सहा वाजता ईडी स्वतःच पोलीस आणत राज्यातील मंत्र्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता घेऊन जाणं ही नियमांची पायमल्ली आहे.’
दरम्यान, ‘देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून केंद्रीय तपास यंत्रणा राज्यात कारवाई करतात. ईडीचे लोक कसे भेटतात, कशी चौकशी करतात हे आम्हाला माहिती आहे. वेळ आल्यावर आम्ही माहिती बाहेर काढू’, असा इशारा नवाब मलिक यांनी यापूर्वी दिला होता. तर, आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकर याला विशेष न्यायालयाने शुक्रवारी २४ फेब्रुवारीपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनावलेली आहे. त्यानंतर आता ईडीच्या रडारवर नवाब मलिक आहेत.