मुंबई :-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या गंभीर आजाराची दखल घेत, मलिक यांच्यावरील याचिका तातडीने सुनावणी घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. त्यानंतर मलिक यांची वैद्यकीय स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केले. तसेच या प्रकरणी पुढील आठवड्यापासून गुणवत्तापूर्ण सुनावणी घेण्यात येईल असे न्यायालयाने आज स्पष्ट केले.
मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मिळावा यासाठी नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. ‘मलिक गेल्या एक वर्षांपासून कोठडीत आहेत. दरम्यान त्यांचा किडनीचा आजार देखील वाढला आहे. एक किडनी निकामी झाली आहे. तसेच कोणत्याही चाचणीसाठी न्यायालयाची परवानगी घेण्यासाठी किमान दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी लागतो. याचा कर्मचाऱ्यांनाही नाहक त्रास होत आहे,’ असे मलिक यांच्या वकिलाने सुनावणी दरम्यान स्पष्ट केले.