नवी मुंबई – एकेकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या नवी मुंबईकरांना आता दिलासा मिळाला आहे. शहरातील रुग्णवाढ झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे वाशीतील सिडको प्रदर्शनी केंद्रातील १,२०० खाटांचे कोरोना रुग्णालय ओस पडले आहे. सध्या तिथे केवळ एकच रुग्ण उरला आहे. कोरोना संपल्याच्या मार्गावर असल्याची ही चिन्हे आहेत. नवी मुंबईकरांसाठी हा मोठा दिलासा आहे.
नवी मुंबईच्या वाशीत एपीएमसी मार्केट असल्यामुळे तिथे दररोज भाज्यांच्या शेकडो ट्रकची ये-जा असते. राज्याच्या आणि देशाच्या विविध भागातून ते येतात. त्यामुळे नवी मुंबईला कोरोनाचा सर्वाधिक धोका निर्माण झाला होता. शहरात मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढल्याने वाशीतील सिडको प्रदर्शनी केंद्रात १,२०० खाटांचे कोरोना रुग्णालय सुरू करण्यात आले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. तशी ती नवी मुंबईतही कमी झाली आहे. परिणामी या कोरोना रुग्णालयात केवळ एकच रुग्ण उपचार घेत आहे. त्यामुळे हे संपूर्ण केंद्र ओस पडले आहे. नवी मुंबईसाठी ही एक दिलासादायक बाब आहे. आरोग्य सेवेला मिळालेले हे मोठे यश आहे, असे या कोरोना केंद्राचे प्रमुख डॉ. वसंत माने यांनी सांगितले. एका दिवसात नवी मुंबईत कोरोनाचे ९२ नवे रुग्ण सापडले. २ जणांचा मृत्यू झाला. शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५० हजार ५४४ झाली. त्यापैकी ४८ हजार ४९८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या २४ तासांत ६६ जण कोरोनामुक्त झाले. यामुळे शहरातील कोरोनामुक्तांचे प्रमाण ९६ टक्के झाले आहे, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे.