नवी मुंबई – नवी मुंबई शहराची एक नवी ओळख निर्माण झाली आहे. प्लॅन सिटी, स्मार्ट सिटी तसेच सायबर सिटी अशा अनेक बिरुदावल्यांमुळे ओळखली जाणारी नवी मुंबई आता लवकरच ‘फ्लेमिंगो सिटी’ या नावानेदेखील ओळखली जाणार आहे. ऐरोली ते बेलापूरच्या खाडी किनाऱ्यापर्यंत येणाऱ्या परदेशी पाहुण्यांमुळे नवी मुंबईला ही अनोखी ओळख मिळणार आहे.
मुंबई एमएमआरडीए क्षेत्रात नवी मुंबई पर्यटन स्थळांचे केंद्रबिंदू बनू शकेल आणि येथे फ्लेमिंगो सिटीसारखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब असेल. हे शहर जगाच्या नकाशावर येऊ शकले तर शहराच्या पर्यटनाच्या दृष्टीने पर्यटक वाढू शकतील यासाठी नवी मुंबई महापालिका प्रयत्न करत असल्याचे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले आहे. सिगल, ऑस्ट्रेलियन डक, फ्लेमिंगो अशा विविध जातींचे परदेशी पक्षी वाशी आणि ऐरोलीच्या खाडी पुलांवर सहज नजरेस पडतात. ऑक्टोबर ते अगदी मे महिन्यापर्यंत हे पक्षी येथे आढळून येतात. दरवर्षी स्थलांतरित पक्ष्यांची संख्या वाढतच आहे. कांदळवनांमध्ये आणि पाणथळींमध्ये अन्नाच्या शोधात बसलेल्या पक्ष्यांना पाहण्याची एक वेगळीच पर्वणी असते. त्यामुळे या पक्ष्यांची ओळख नवी मुंबई शहराला जागतिक पातळीवर एक वेगळी दिशा देण्यास मदत होणार आहे.