नवी दिल्ली – मोदी सरकारच्या वतीने संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सैन्यातील भरतीसाठी जाहीर केलेली अग्नीपथ योजना आता सरकारसाठीच ‘अग्नीपथ’ बनली आहे. बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा या राज्यांमध्ये या योजनेला तीव्र आक्षेप घेतला जात आहे. अग्नीपथच्या विरोधात बिहार, हरियाणा, राजस्थानसह 5 राज्यांमध्ये आज दुसर्या दिवशीही तरुणांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली.
बिहारमध्ये सलग दुसर्या दिवशी झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी पाटणा इंटरसिटी एक्स्प्रेस जाळली. पाटलीपुत्र एक्स्प्रेसवर दगडफेक केली. रस्त्यांवर टायर जाळून ‘रास्ता रोको’ केला. राजस्थानच्या आंदोलकांनी दिल्ली-जयपूर महामार्गावर ‘रास्ता रोको’ केला. उत्तर प्रदेशातील बरेलीत तरुणांनी आंदोलन केले. गुरुग्राम आणि पलवल येथे आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. वाहनांची तोडफोड केली. दगडफेकीत पोलिसांसह अनेक जण जखमी झाले. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. आंदोलनाचे लोण आपल्या राज्यांत येण्याच्या भीतीने धास्तावलेल्या अनेक राज्यांनी अग्निवीरांसाठी घोषणांचा पाऊस पडला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलीस भरती आणि संबंधित सेवांच्या भरतीसाठी अग्निवीरांना प्राधान्य दिले जाईल, अशी घोषणा केली.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही अशाच घोषणा केल्या. हरियाणा सरकारनेही अग्निवीरांना नोकरीत प्राधान्य देण्याची घोषणा केली. सैन्यदलातील भरतीसाठी मोदी सरकारच्या वतीने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी अग्नीपथ योजना जाहीर केली. या योजनेनुसार सैन्य दलात 4 वर्षे अग्निवीर म्हणून भरती केली जाणार आहे. त्यानंतर त्यातील 25 टक्के तरुणांना कायमस्वरूपी सेवेत घेतले जाणार आहे. मात्र त्यासाठी पुन्हा त्यांची तपासणी होणार आहे. या अग्निवीरांना 11 लाखांचे पॅकेज दिले जाणार आहे. संरक्षण मंत्र्यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या या योजनेनंतर त्याचे तीव्र पडसाद काल बुधवारी बिहारमध्ये उमटले. तेथे अनेक जिल्ह्यांत दगडफेक आणि ‘रास्ता रोको’ आंदोलने झाली. संतप्त तरुणांनी रस्त्यावर टायर जाळले. 4 वर्षांनंतर आमचे काय? असा सवाल त्यांनी विचारला. नंतर आज पुन्हा बिहारमध्ये हिंसक आंदोलन झाले. मुंगेर, कैमूर, सहरसा, छपरा आदी जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. रेल्वे आणि वाहनांवर दगडफेक केली. कैमूर येथे पाटणा इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लावली. रस्त्यावर अनेक ठिकाणी टायर जाळले. त्यामुळे वाहतूक बंद पडली. आंदोलकांना पांगवण्यासाठी काही ठिकाणी पोलिसांनी लाठीमार केला. बिहारमधील आंदोलनाचे लोण हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये पोहोचले.
उत्तर प्रदेशातील बरेलीत लष्करी भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. राजस्थानातील तरुणांनी दिल्ली-जयपूर हायवेवर ‘रास्ता रोको’ केला. बिहारच्या भागलपूरमध्ये आंदोलकांनी रेल्वे रुळावर टायर जाळले. रुळाच्या क्लिप काढल्या. त्यामुळे येथील रेल्वे सेवा ठप्प झाली. नाथनगर रेल्वे स्थानका गरिब रथ एक्सप्रेस यामुळे थांबली होती. विक्रमशिला एक्स्प्रेससह अनेक गाड्या आंदोलनामुळे रखडल्या. हरियाणातील गुरुग्राम आणि पलवल येथे तरुणांनी पोलिस आणि वाहनांवर दगडफेक केली. महामार्गावर रास्ता रोको केला. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. आंदोलकांनी दिल्ली-जयपूर हायवे रोखून धरला. त्यानंतर दोन्ही ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्याचे पोलीस आटोकाट प्रयत्न करत होते. हरियाणातील दगडफेकीत पोलिसही जखमी झाले.
‘अग्निवीरां’साठी अनेक
राज्यांचा घोषणांचा पाऊस
तरुणांच्या उग्र आंदोलनामुळे हादरलेल्या उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा येथील राज्यांनी अखेर बचावासाठी अग्निवीरांसाठी घोषणांचा पाऊस पाडला. योगी आदित्यनाथ यांनी पोलीस आणि संबंधित सेवांच्या भरतीमध्ये अग्निवीरांना प्राधान्य देणार असल्याची घोषणा केली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही राज्य पोलीस भरतीत या उमेदवारांना प्राधान्य देणार असल्याचे जाहीर केले. हरियाणा सरकारनेही अग्निवीरांना प्राधान्य देण्याची घोषणा केली.