मुंबई – मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रभाग फेररचना करण्यात आली आहे. यात ९ प्रभागांची नव्याने भर पडून एकूण प्रभागांची संख्या २२७ वरून २३६ करण्यात आली आहे. मात्र ही प्रभाग रचना राजकीय हेतूने केली गेली आहे. प्रभाग फेररचना करतांना कोळीवाड्यांतील मतदार एक राहू नये यासाठी जाणीवपूर्वक वेगवेगळ्या प्रभागांमध्ये विभागणी करण्यात आल्याचा दावा मच्छीमार संघटनांनी केला आहे.
प्रभाग रचनेत एक कोळीवाडा दोन दोन प्रभागात विभागला गेला. कोळी बांधवांचे सदस्य निवडून येऊ नयेत यासाठी हा कट रचला गेला, असा आरोप करत याबाबत हरकती नोंदविणार असल्याचे अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी म्हटले आहे. तर माहूल गाव-अंबापाडातील आगरी-कोळी समाजाचे नेते राजेंद्र माहुलकर यांनीही या नवीन प्रभाग रचनेवर आक्षेप घेत हा कोळी-आगरी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सदस्यांची संख्या कमी करण्याचा डाव असून हा अन्य ओबीसी समाजावरही अन्याय असल्याचा आरोप केला आहे. नव्याने वाढलेल्या प्रभागांमुळे कोळी वाड्याचे विभाजन झाले आहे. दरम्यान, यासाठी हरकती, सूचना घेण्याची तयारी ही कोळीबांधवांनी केली आहे.
२०१२ पासून मुंबई महापालिकेत झालेल्या प्रभाग रचनेत पुढील कोळीवाडे यांचे प्रभाग विभाजन झाले. प्रभाग पुर्नरचनेत अनेक प्रभागांप्रमाणे मुंबईत ६३ गावठाणे आणि ३१ कोळीवाड्यांचे दोन ते तीन प्रभागांमध्ये विभाजन झाले आहे. त्यामध्ये कुलाबा आणि कफ परेड, मुलुंड येथील गावन आणि नाहूर नानेपाडा, माहूल येथील कोळीवाडे, वरळी, जुहू, गोराई, ट्रॉम्बे, कांजूरगाव, चारकोप, मरोळ,दहिसर मढ मार्वे अशा कोळीवाड्यांचा समावेश आहे.