संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 21 May 2022

नव्या युगाचा प्रारंभ – रोहित रमाकांत पांडे

7 मार्च 2022 रोजी ‘नवाकाळ’ने 100व्या वर्षांत पदार्पण केले. या दिवशी ‘नवाकाळ’च्या संपादकपदाची धुरा माझ्या हाती सोपविण्यात आली. गेली 25 वर्षे 24 तास वर्षाचे सर्व दिवस अत्यंत तळमळीने विविध आव्हानांना सामोरे जात अपार मानसिक आणि शारीरिक कष्ट घेताना मी माझ्या आईला अर्थात जयश्री खाडिलकर-पांडे यांना पाहिले आहे. आपल्या लेखणीतून गोरगरीब जनतेचा आवाज कसा उठवता येतो आणि सामान्य जनतेला न्याय कसा मिळवून देता येईल यासाठी त्यांची धडपड मी स्वतः अनुभवली आहे.

याचबरोबर दुसर्‍या बाजूला 21 व्या शतकातील आधुनिक विचारांनी माझी तरुण पिढी आगेकूच करीत असताना ही पिढी व मागच्या पिढीमध्ये विचारांची भिन्नता सातत्याने जाणवत होती. माझ्या आईने ज्याप्रकारे काम केले त्या वेळापत्रकात मी गुंतू नये अशी अजाण भावना माझ्या मनात रुजलेली होती. आईचे नेहमी म्हणणे असायचे की, तरुणांनी पत्रकारिता किंवा वकिली यांसारखे क्षेत्र निवडावे. कमी भांडवलात आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य या दोन क्षेत्रात आहे. जेथे तुम्हाला तुमच्या कामाचे स्वातंत्र्य राखता येते. याचा अर्थ असा की, भांडवलशाही व्यवस्थेचे गुलाम न होता, पैशांच्या बोज्याखाली न दबता तुम्हाला काम करण्याचा आनंद घेता येतो. तिच्या म्हणण्यानुसारच तिची कायम अशी इच्छा होती की, आपल्या मुलानेदेखील समाजसेवेचे व्रत जोपासणारे कार्यक्षेत्र निवडावे. आपली इच्छा व्यक्त करताना हे क्षेत्र का निवडावे हे तिने मला नेहमी पटवून दिले. गेल्या काही वर्षात ‘नवाकाळ’ची व्यवस्थापकीय आणि आर्थिक व्यवहारांची बाजू मी माझ्या आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसात केली आहे. आईप्रमाणे माझे आजोबा अग्रलेखांचे बादशहा नीलकंठ खाडिलकर यांचादेखील मला बालपणापासून सहवास लाभला. माझे आजोबा नेहमी सांगत असत की दोन रुपयाच्या लेखणीच्या ताकदीवर भांडवलशाहीच्या स्पर्धेत मी ‘नवाकाळ’चे स्थान टिकवून ठेवले. तीच परंपरा माझ्या आईनेदेखील जपली.

या दरम्यान युवा पिढीला स्वाभाविकपणे असणारे नवनवीन क्षेत्रांचे आकर्षण आणि घरातील जबाबदारीचे वातावरण याचा समतोल राखण्याचा मी नेहमी प्रयत्न करीत आलो. आज मला हे सांगताना अभिमान वाटतो की, मी जयश्री आणि रमाकांत पांडे यांचा मुलगा आहे. स्वतःची संपादकपदाची कारकीर्द यशाच्या शिखरावर असताना आपल्या मागील तीन पिढ्यांची परंपरा राखत आईने माझ्यावर संपादकपदाची जबाबदारी सोपविली आहे. सर्वप्रथम देश, समाज, बांधव आणि नंतर काही राहिले तर आपला परिवार हा वारसा मला खाडिलकरांच्या चार पिढ्यांकडून मिळाला आहे. पैशांच्या मायावी जाळ्यामध्ये अडकलेल्या या दुनियेमध्ये ‘नवाकाळ’चे बाभूळ झाड हे ‘वारा खात – गारा खात’ खंबीरपणे उभे आहे. मला शिकविण्यात आलेली तत्वे, मूल्यांची हिरवीगार पाने आणि विश्‍वासाचा सुगंध पसरविणारी फुले पत्रकारितेच्या या बाभूळ झाडावर उमलतील, अशी खात्री देतो. आमचे मायबाप वाचक, वृत्तपत्र विक्रेते आणि जाहिरातदारांना साक्षी ठेवून तसेच माझ्या मागे खंबीरपणे उभे राहणार्‍या मित्रपरिवाराच्या आणि कुटुंबाच्या आशीर्वादाने मी अत्यंत नम्रपणे ‘नवाकाळ’च्या चळवळीची धुरा स्वीकारतो आहे. संपादक या नात्याने माझे पुढील आयुष्य सर्वसामान्य जनतेला समर्पित राहील.

Share with :
Facebook
Twitter
Pinterest
LinkedIn
आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami