मुंबई – महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण होते, तर काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. परंतु नांदेड जिल्ह्यात मात्र वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली.
नांदेडमध्ये मार्च महिन्यापासून तापमान अधिक आहे. आता तर ते ४३.४ अंशांवर पोहोचले आहे, त्यामुळे दुपारच्या उन्हात घराबाहेर पडण्याचे धाडसही नागरिकांना होत नाही. अशातच काही भागांत काल संध्याकाळी पावसाने हजेरी लावल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. तर रात्रीदेखील विजांच्या कडकडाटसह पाऊस कोसळला. नायगांव, बिलोली, मुखेड आणि देगलूर तालुक्यात झालेल्या या पावसाचा परिणाम येथील वीजपुरवठ्यावर झाला. त्यामुळे आता ग्रामीण भागातील नागरिकांना विजेशिवाय राहावे लागत आहे. तसेच या अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.