नागपूर – नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत आज भल्या पहाटे २ च्या सुमारास भीषण आग लागली. त्यात तेथील शेडमध्ये ठेवलेली लाल मिरची जळून खाक झाली. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे कोट्यावधींचे नुकसान झाले. यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
नागपूरच्या वेशीवरील कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील शेडला पहाटे २ च्या सुमारास आग लागली. तिथे मिरच्यांचा साठा होता. आगीची माहिती मिळताच अग्निशामन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आगीचा भडका उडाला होता. अनेक तासानंतर त्यांनी आग आटोक्यात आणली. मात्र आगीत बाजारातील ८ दुकानांचे नुकसान झाले. गोदामातील सुमारे ५ हजार पोती मिरच्या जळून खाक झाल्या. याचा मोठा फटका व्यापारी आणि शेतकऱ्यांना बसला. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केला. यात कोट्यावधीचे नुकसान झाले असल्याने भरपाई मिळावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी बाजार समितीकडे केली आहे.