नागपूर- वेदांता फॉक्सकॉन पाठोपाठ टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरले आहे. सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष सुरु आहे. राज्यातील मोठे प्रकल्प गुजरातला जात आहेत. या परिस्थितीला राज्य सरकारच जबाबदार आहे, असा सूर विरोधकांकडून आळवला जात आहे. याचा निषेध म्हणून आज नागपूरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराजवळ राष्ट्रवादीकडून गाजर दाखवत आंदोलन करण्यात आले. काही वेळातच पोलिसांनी आंदोलनकत्यार्र्ंना ताब्यात घेतले.
टाटा समुहाचा प्रकल्प गुजरातला गेल्याच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आज उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांच्या नागपूरातील घराजवळ राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीच्या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर फडणवीस यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली होती. ट्रॅफीक पार्क ते फडणवीस यांच्या घरापर्यंत राष्ट्रवादीने हाती फलक घेत आंदोलन केले. शिंदे सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली आहे. खोके सरकारचा निषेध असो, उद्योगाचे विमान गुजरातला, बेरोजगारीचे गाजर मराठी तरुणाला, गुजरात तुपाशी, महाराष्ट्र उपाशी, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. या आंदोलनाला परवानगी नसल्याने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. दरम्यान, नवी मुंबई, नाशिक आणि पुण्यातही राष्ट्रवादीच्या कार्यकत्यार्र्ंनी आंदोलन केले.