नागपूर: नागपूर मेट्रोने प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना तिकिट दरात 30 टक्के सवलत देण्यात येणार आहे. ७ फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. तिकिटसाठी रोख किंवा महाकार्डचा वापर करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे स्वस्त दरात मेट्रोतून शाळा, महाविद्यालयापर्यंतच नव्हे तर इतर भागातही प्रवास करता येणार आहे. या निर्णयामुळे शालेय विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
मात्र नागपुरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मेट्रोने अशी सवलत दिली नसल्याने विद्यार्थ्यांना खासगी वाहन, सिटी बस किंवा ऑटोचाच पर्याय निवडावा लागणार आहे. मागील काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांना तिकिट दरात सवलतीची नागरिकांची मागणी होती. या मागणीवरून महामेट्रोने विद्यार्थ्यांना तिकिट दरात सवलत उपलब्ध करून दिली आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना फोटो असलेले ओळखपत्र तयार करून द्यावे, असे आवाहन महामेट्रोने केले आहे.