कराड- पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र नारायणपूर येथील दत्तजयंती सोहळ्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली असून पुणे आणि सातारा जिल्ह्यातून दत्त भक्तांच्या पालख्या आणि दिंड्याही नारायणपूरकडे मार्गस्थ झालेल्या दिसत आहेत. त्यामुळे हे महामार्ग दत्त नामाच्या जयघोषाने दुमदुमून निघाले आहेत.
नारायणपूरच्या एकमुखी दत्त मंदिरात उद्या सोमवार ५ ते बुधवार ७ डिसेंबर दरम्यान दत्तजयंती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.त्यासाठी मंदिराचे प्रमुख नारायण ऊर्फ आण्णा महाराजांच्या मार्गदर्शनाखाली दत्त सेवेकरी मंडळ भाविकांच्या सेवेसाठी सज्ज झाले असल्याची माहिती पोपट महाराज स्वामी, भरत क्षीरसागर आणि दिगंबर भिंताडे यांनी दिली आहे. दत्त जन्म सोहळा मार्गशीर्ष शु.१४ ला सायंकाळी असतो.पाळणा हलवून त्याची सुरुवात करतात. रात्री शोभेचे दारुकाम,दत्त जन्म कीर्तन तर दुसर्या दिवशी ग्रामप्रदक्षिणा,सवाद्य मिरवणूक निघते.