नाशिक – नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस हवालदाराने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस हवालदार अनिल तानाजी जमदाडे (५०) असे या आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव असून ते पंचवटी पोलीस ठाण्यात हजेरी मास्तर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
अनिल जमदाडे हे गुरुवारी २४ फेब्रुवारी रोजी पोलीस ठाण्यातील काम उरकून घरी निघाले होते. मात्र ते थेट घरी न जाता त्यांनी घराजवळील ओळखीच्या सलून दुकानाजवळ आपली दुचाकी लावली. काही वेळाने माझा मुलगा दुचाकी घेऊन जाईल असे सलून मालकाला सांगून ते तिथून निघून गेले. त्यानंतर दुपारच्या सुमारास एका पोलिसाने ओढा रेल्वेखाली आत्महत्या केल्याची माहिती आडगाव पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असता मयत व्यक्ती पंचवटी पोलीस ठाण्यातील कर्मचारी असल्याचे समोर आले. अनिल जमदाडे हे मुळचे दिंडोरी तालुक्यातील मातेरेवाडी येथील रहिवासी होते. सध्या ते पंचवटी येथील रासबिहारी लिंक रोडवरील मानेनगर परिसरात स्थायिक झाले होते. अनिल जमदाडे हे १९९१ मध्ये पोलीस दलात रुजू झाले होते. काही दिवसांपूर्वी त्यांची पंचवटी पोलीस ठाण्यात बदली झाली होती. त्याआधी ते म्हसरूळ पोलीस ठाण्यात कार्यरत होते. सध्या ते पंचवटी पोलीस ठाण्यात हजेरी मास्तर म्हणून काम करत होते. अत्यंत मनमिळाऊ स्वभावाच्या जमदाडे यांच्या आत्महत्येने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येचा पुढील तपास आडगांव पोलीस करीत आहेत.