नाशिक – नाशिकरोड येथील भारतीय चलनी नोटा चालल्या जाणार्या प्रेसमध्ये आता नेपाळच्या नोटा देखील छापल्या जाणार आहेत.यंदा नेपाळच्या ४३० कोटी रुपयांच्या नोटा तसेच भारताच्या पाच हजार कोटी रुपयांच्या छपाईची मोठी ऑर्डर मिळाल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.नेपाळची १ हजार रूपयांची नोट याठिकाणी छापली जाणार आहे. देशामध्ये डेबिट कार्ड, युपीआय ऑनलाइन हे प्रकार वाढत चालले असून कागदी चलनांचे प्रमाण कमी होत असल्याने भारत सरकार आता वेगवेगळ्या देशांच्या चलनी नोटा छापण्याचा विचार करत आहे.या प्रेसला भारताचा पहिला ई पासपोर्ट छापण्याचा बहुमान मिळाला असून, ई पासपोर्टच्या ७५ लाख इन ले चिप प्रेसला मिळाल्या आहेत. तर दोन दिवसांपूर्वी दिवंगत कामगारांच्या ४८ वारसांना प्रेसमध्ये नोकरी देण्याचा प्रारंभ झाला.कमीत कमी वेळ व कमी मनुष्यबळात आंतरराष्ट्रीय दर्जाचे काम हे नाशिकरोड प्रेस कामगारांचे वैशिष्ट्य आहे. सध्या प्रेसमध्ये पासपोर्ट, बँकांचे चेक्स, ज्युडिशियल व नॉन ज्युडिशियल स्टॅम्प्स, टपाल तिकिटे,पोस्ट कार्ड व चलनी नोटांची छपाई केली जाते. अलीकडे निवडणूक आयोगाचे इलेक्शन सील तसेच अन्य राज्यांचे लिकर सील छपाई होत आहे. १९६२ साली नोटांसाठी नाशिकरोडला स्वतंत्र सीएनपी नोट प्रेस सुरू झाली.तेथे एक रुपयापासून पाचशेपर्यंतच्या भारतीय नोटा छापल्या जातात.
आतापर्यंत या प्रेसने १९४८ साली पाकिस्तानच्या तर १९४० साली चीनच्या नोटा छापून दिल्या.पूर्व आफ्रिका, चीन, इराण,भूतान,श्रीलंका, बांगलादेश, इराक, नेपाळ आदी देशांच्या नोटांची तसेच हैदराबादच्या निजामाच्या नोटाही छापून दिल्या आहेत. २००७ साली नेपाळच्या नोटा छापल्या होत्या. यंदा पुन्हा ४३० कोटी नोटा छापण्याची ऑर्डर नेपाळने दिली असून, कामगार रात्रीचा दिवस करून हे काम करत असल्याची माहिती प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे व कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी दिली.