नाशिक – सहलीसाठी नाशिकला आलेल्या सुरतमधील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा धबधब्यावरून पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तक्षिल प्रजापती (१८) असे त्याचे नाव आहे. तो मित्रांसोबत नाशिकला आला होता. पिंपळसोंड उंबरपाडा तातापाणी येथील गरम पाण्याच्या झऱ्याजवळ पाय घसरून तो सुमारे दीड हजार फूट उंचीवरून खडकावर पडला. त्यात त्याचा मृत्यू झाला.
गुजरातच्या सुरत येथील सार्वजनिक कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाचे १०-१२ विद्यार्थी सहलीला नाशिकला आले होते. ते उंबरपाडा तातपाणी येथील साखरचोंड येथील वाहूटचोंड शॉवर पॉईंट धबधब्यावर आंघोळ करत होते. त्यावेळी तक्षिलचा पाय घसरला आणि तो सुमारे दीड हजार फूट उंचीवरून खडकावर कोसळला. डोक्याला जबरदस्त मार लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिस आणि वन कर्मचाऱ्यांनी सायंकाळी ५ च्या सुमारास त्याचा मृतदेह बाहेर काढला.