नाशिक – नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी गडावर ढगफुटीसदृश पाऊस झाला. या पावसामुळे सहा ते सात भाविक जखमी झाले आहेत. या मंदिर मार्गावर मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला आहे. हा मार्गसुद्धा काही प्रमाणात खचला असल्यामुळे जवळपास दीड महिना मंदिर पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे सप्तश्रुंगी देवीचे दर्शन भाविकांना घेता येणार नाही, अशी माहिती सप्तश्रुंगी देवी मंदिर ट्रस्टने दिली आहे.
सप्तश्रुंगी गड मंदिर परिसरात पावसाचे पाणी पायऱ्यांवरून खाली उतरल्यामुळे चढ मार्गावर पूर परिस्थिती निर्माण झाली. यावेळी पुराबरोबर मोठ्या संख्येने दगड गोटे, माती, झाडांचे रोपटे आणि इतर साहित्य वाहून आल्याने मंदिरात जात असलेल्या भाविकांची तारांबळ उडाली आहे. पावसामुळे दुखापत झालेल्या सात भाविकांना उपचारासाठी धर्मार्थ आणि ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शिवाय घटनास्थळी सप्तश्रुंगी देवी ट्रस्टचे अधिकारी उपस्थित असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने आणि की कमांडो फोर्सने विशेष परिश्रम घेऊन भाविकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.