नाशिक – १ डिसेंबरपासून नाशिक शहरात दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती लागू करण्यात येणार आहे. त्यात विना हेल्मेट आढळणाऱ्या दुचाकीस्वारांवर ५०० रुपयांच्या दंडाची कारवाई होऊ शकते. तसा आदेश पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी काढला आहे.
नाशिक शहरात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकीच्या अपघातातील मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. जवळपास ८३ दुचाकीस्वारांचा हेल्मेट नसल्यामुळे मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये हेल्मेट सक्ती लागू करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. त्यानुसार १ डिसेंबरपासून शहरात हेल्मेट सक्ती लागू होणार आहे. विना हेल्मेट दुचाकीस्वार सापडल्यास त्याची परीक्षा घेतली जाणार आहे. समुपदेशन केले जाणार आहे. त्यानंतर काही प्रकरणांत दुचाकीस्वारावर ५०० रुपयांच्या दंडाची कारवाई होऊ शकते. १५ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोंबर या काळात दुचाकीचे २३ अपघात झाले. त्यात १७ पुरुष आणि ४ महिला अशा २१ जणांचा मृत्यू झाला. विनाहेल्मेट वाहन चालवल्यामुळे ते मृत्युमुखी पडले. तेव्हा असे अपघाती मृत्यू टाळण्यासाठी नाशिकमध्ये १ डिसेंबरपासून हेल्मेट सक्ती लागू होणार आहे.