नाशिक – नाशिकच्या कॉम्बॅक्ट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कूल अर्थात ‘कॅटस’मधले लष्काराचे दोन अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात अडकले आहेत. कंत्राटदाराकडून लाच घेताना लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांना सीबीआयने रंगेहात अटक केली आहे. सहाय्यक अभियंता मेजर हिमांशू मिश्रा आणि कनिष्ठ अभियंता मिलिंद वाडिले अशी अटक करण्यात आलेल्या लष्करी अधिकाऱ्यांची नावे आहेत.
बिलाचे पैसे काढून देण्यासाठी या दोनही लष्करी अधिकाऱ्यांनी ठेकेदाराकडून १ लाख २० हजारांची लाच मागितली होती. त्यांना सीबीआयने रंगेहाथ पकडले. सीबीआयकडून गुरूवारी रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली आहे.या दोन्ही अधिकाऱ्यांच्या राहत्या घरी आणि त्यांच्या कार्यालयाची सुद्धा सीबीआयकडून झाडाझडती घेण्यात येणार आहे. दरम्यान,सीबीआयने नाशिकमध्ये केलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे. यापूर्वी नाशकात सीबीआयकडून जीएसटीच्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली होती.