नाशिक- नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवून काँग्रेसचे सत्यजित तांबे जिंकले. त्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पडद्यामागे घडलेले नाट्य स्पष्ट केले. गेली ९० वर्षे कॉंग्रेसशी एकनिष्ठ असणाऱ्या आमच्या कुटुंबाला बदनाम करण्याचे षड्यंत्र आखले गेले. उमेदवारी अर्ज भरताना जाणीवपूर्वक नाशिक ऐवजी नागपूर आणि औरंगाबादचे चुकीचे एबी फॉर्म आम्हाला पाठवण्यात आले, असा गौप्यस्फोट सत्याजित तांबे यांनी केला.आता मी अपक्ष आमदार म्हणून काम करणार असे त्यांनी स्पष्ट केले.
सत्यजित तांबे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, मागील महिनाभराच्या काळात आमच्या कुटुंबावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले. आमचे कुटुंब सुरुवातीपासून काँग्रेस पक्षात आहे. २०३० मध्ये आमच्या कुटुंबाला काँग्रेस पक्षात येऊन १०० वर्षे होतील. आम्ही पक्षासाठी निष्ठेने काम केले. विविध आव्हानात्मक परिस्थितीत आम्ही काम केले. युवक काँग्रेससाठी काम करताना माझ्यावर ५० पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे मला पासपोर्टही मिळत नव्हता. मी चळवळीतून पुढे आलेला कार्यकर्ता आहे. ज्यावेळी मी पक्षश्रेष्ठींकडे पद किंवा जबाबदारीसाठी जायचो, तेव्हा तुमच्या घरात तुमचे वडील आमदार आहेत त्यामुळे तुम्हाला विधान परिषद देता येणार नाही, असं मला सांगितले गेले. २००९ पासून माझ्या वडिलांनी अत्यंत कष्टाने नाशिक मतदारसंघ वाढवला आहे. मी आमचे पक्षश्रेष्ठी एच के पाटील यांना मला संघटनेत एखादं पद किंवा जबाबदारी मागितली होती. पण दुर्दैवाने तसं झालं नाही. तुम्ही तुमच्या वडिलांच्या जागेवर विधान परिषदेची निवडणूक लढा असे सांगण्यात आले. जेव्हा एच के पाटील बोलले तेव्हा मला प्रचंड संताप आला. तेव्हा मी त्यांना सांगितले की, वडिलांच्या जागी निवडणूक लढवावी, अशी माझी मानसिकता नाही. पण दुसरी कुठली संधी तुला देणे शक्य नाही, तू वडिलांच्या जागी प्रयत्न कर, असा सल्ला ते मला देऊ लागले. याला माझा पूर्णपणे विरोध होता.
पुढे बोलताना सत्यजित तांबे म्हणाले की, नाशिक पदवीधरसाठी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी प्रदेश कार्यालयाकडून चुकीचे एबी फॉर्म देण्यात आले. एबी फॉर्म हा मुद्दा लहान-सहान नाही, चुकीचा फॉर्म देऊन माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा आणि बाळासाहेब थोरातांना बदनाम करण्याचा पक्षाचा डाव होता .नागपूर आणि औरंगाबादचे एबी फॉर्म पाठवले. त्यानंतर काही तास उरले असताना माझ्या वडिलांच्या नवाचा एबी फाॅर्म पाठवण्यात आला. माझ्यावर भाजपचा पाठिंबा घेतल्याचा आरोप करण्यात आला. पण चुकीचा एबी फॉर्म देण्याच्या मुद्द्यावर नाना पटोले यांनी का खुलासा केला नाही.मला संधी मिळू नये, युवकांना संधी मिळू नये म्हणून वरच्या स्तरावर प्रयत्न करण्यात आले. माझ्या वडिलांना शो कॉज नोटिस न देता एक मिनिटात निलंबित करण्यात आले. मला काँग्रेसमधून बाहेर काढण्याचे काम काही नेत्यांकडून केले जात आहे .फॉर्म चुकीचे आल्याचेही मी पक्षाला कळवले होते. जर मला अपक्ष फॉर्म भरायचा असता तर मी प्रदेश कार्यालयाला चुकीचा फॉर्म आल्याचे कळवले नसते. मला चुकीचा एबी फॉर्म देण्यात आला, त्यावर काहीही खुलासा करण्यात आला नाही. पण पक्षाचा अंतर्गत प्रश्न असून तो आतच मिटवावा अशी भूमिका मी घेतल्यानंतर मला पक्षाचा पाठिंबा हवा असेल तर त्यासाठी एक पत्र लिहायला लावले . त्यानंतर मला त्यातून माफी मागायला सांगितली. मी पक्षामध्ये अनेक वर्षे काम केलं, त्यामुळे मी माफीही मागायला तयार झालो. पण एकीकडे मला माफी मागायला लावली आणि दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. हे माझ्यासाठी धक्कादायक होते. मी दिल्लीशी संपर्क केला, तरीही मला पक्षाने पाठिंबा दिला नाही” अशी धक्कादायक माहिती पत्रकार परिषदेत सत्यजित तांबे यांनी दिली.