नाशिक- आग्रा महामार्गावरील पंचवटी हद्दीतील उड्डाणपुलावर बुधवारी रात्री पिंपळगावकडे जाणाऱ्या एका कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात नाशिक युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या सोबत असलेले तीन सहकारी यात जखमी झाले असून त्यांना नाशिकमधील लोकमान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
नाशिक पदवीधर मतदारसंघाचा गुरुवारी निकाल होता. यासाठीच मतमोजणीच्या ठिकाणी जायचे म्हणून मानस बुधवारी रात्री त्यांच्या सहकाऱ्यांसोबत निघाले होते. त्यावेळी नाशिकच्या आडगाव परिसरातील उड्डाणपुलावर अपघात झाला. अपघातानंतर त्यांना नाशिकच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मानस हे काँग्रेसचे नाशिकचे युवक जिल्हाध्यक्ष होते. काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी त्यांनी पुरोगामी, धर्मनिरपेक्ष विचारांसाठी काम सुरु केले होते. ‘युथ फॉर डेमोक्रसी’ या संघटनेच्या माध्यमातून धर्मनिरपेक्ष विचारांना जास्तीत जास्त युवकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ते आणि त्यांचे सहकारी करत होते. काँग्रेस पक्षाची सोशल मीडियावरील बुलंद तोफ म्हणूनही त्यांची ओळख होती. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या घराबाहेर मानस यांनी केलेल्या आंदोलनाची भरपूर चर्चा झाली होती. दानवेंनी शेतकऱ्यांसाठी वापरलेल्या भाषेवर आक्षेप घेत त्यांनी आंदोलन केले होते.
मानस त्यांच्या लिखाणामुळे अनेक तरुण काँग्रेससोबत जोडले गेले. सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर त्यांची बाजू सोशल मीडियावर मांडणे व प्रचारासाठी लिखाण करणे अशा अनेक जबाबदाऱ्या मानस यांनी पार पाडल्या. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुक काळात पगार यांच्या अकस्मात निधनामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.