नाशिक -नाशिक महापालिकेने शहरात प्लास्टिक वापराला पूर्णपणे बंदी घातली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडाची कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. प्लास्टिक बंदीमुळे शहरात कोणत्याही जाडीच्या किंवा लांबीच्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर, विक्री आणि साठवणुकीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
प्लास्टिकचा सार्वजनिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. मोकाट जनावरे प्लास्टिक खात असल्यामुळे त्यांना शारीरिक व्याधी होतात. प्लास्टिकचे विघटन होत नाही. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक साचून गटारे तुंबतात. अनेक ठिकाणी जलमय परिस्थिती निर्माण होते. हे सर्व प्रकार लक्षात घेऊन नाशिक शहरात पूर्णपणे प्लास्टिक बंदी घालण्यात आली आहे. पालिका आयुक्त रमेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली राजीव गांधी भवन मुख्यालयात बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारीही बैठकीला उपस्थित होते. नागरिक, संस्था, कार्यालये, दुकानदार, हॉटेल आणि खानावळ चालक, दूध विक्रेते, भाजीविक्रेते आदींनी कुठल्याही प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करू नये. त्यांची विक्री आणि साठवणूक करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जे या नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर दंडाची कारवाई केली जाईल, असा इशारा पालिका आयुक्त पवार यांनी दिला. या गुन्ह्यांत पहिल्यांदा ५ हजार, दुसऱ्यांदा १० हजार आणि तिसऱ्यांदा २५ हजार रुपये व ३ महिने कारावासाची शिक्षा होईल, असेही त्यांनी सांगितले.