सातारा: हैदराबादच्या निझामाची मालमत्ता पुन्हा चर्चेत आली आहे. थेट साताऱ्याच्या जिल्हाधिकारींनी महाबळेश्वरमधील निझामाच्या मालमत्तेवर कारवाईचा बडगा उगारला आहे. विशेष म्हणजे २०१६ पासून या संपत्तीचा वाद सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हैद्राबाद येथील निझामांना भाडेपट्ट्याने दिलेला १५ एकर १५ गुंठे भूखंड व त्यावर निझामांनी बांधलेला अलिशान वुडलॉन हा बंगला सील करण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार महाबळेश्वर तहसिलदार सुषमा चौधरी पाटील यांनी मोठ्या पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करून त्याचा ताबा घेतला. मुख्य बंगला व परीसरात असलेल्या सर्व इमारतींना सील ठोकण्यात आले. आजच्या बाजारभावाप्रमाणे या मिळकतीची किंमत २०० ते २५० कोटी रुपयांची आहे. सध्या महाबळेश्वरचे माजी नगरसेवक कुमार शिंदे यांच्याकडे या इमारतीचा ताबा होता. महाबळेश्वरमधील ही मिळकत एक डिसेंबर रोजी ताब्यात घेण्यासाठी आलेल्या साठ ते सत्तर लोकांच्या जमावामुळे या भागात तणाव निर्माण झाला होता. यापूर्वी देखील अनेक वेळा मिळकतीचा ताब्या घेण्यावरून दोन गटात वाद झाले आहेत. ही बाब लक्षात घेऊन सातारा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी २ डिसेंबर रोजी महाबळेश्वर तहसिलदार सुषमा चौधरी पाटील यांना वुडलॉन ही मिळकत ताब्यात घेण्याचे आदेश दिले.
तहसिलदार सुषमा चौधरी पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथक सकाळी दहा वाजता वुडलॉन बंगल्यावर पोहचले येथील मुख्य बंगल्याशेजारी असलेल्या स्टाफ क्वार्टर मध्ये गेली अनेक वर्षे माजी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे व त्यांचे पती माजी नगरसेवक कुमार शिंदे हे राहत आहेत. त्यांना शासकीय कारवाई बाबत तहसिलदार पाटील यांनी माहिती दिल्यांनतर शिंदे कुटुंबियांनी आपले सर्व साहित्य बाहेर काढण्यास प्रारंभ केला. दरम्यान, मुख्य बंगल्याच्या सर्व खोल्यांना तहसिलदार यांच्या समक्ष सील ठोकण्यात आले. तर सायंकाळी साडे पाच वाजता निझामांच्या स्टाफ क्वार्टरला सील ठोकण्यात आले. सर्वात शेवटी या बंगल्याचे दोन्ही गेट देखील पथकाने सील केले. दरम्यान, या बंगल्यात कोणाही खाजगी व्यक्तीला प्रवेश करण्यास मनाई असल्याचे फलक शासनाच्या वतीने लावण्यात आले आहेत.